‘वेरूळ-अजिंठा आतंरराष्ट्रीय महोत्सवा’चे ता. २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान आयोजन; ‘पूर्वरंग’ कार्यक्रमाने होणार सुरवात

औरंगाबाद, ११ फेब्रुवारी २०२३ : औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणींची ओळख दृढ करण्यासाठी वर्ष १९८५ पासून वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केला जातो; मात्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी व कोरोना महामारीमुळे या महोत्सवात खंड पडला होता; मात्र वर्ष २०१७ नंतर तब्बल सात वर्षांनंतर हा महोत्सव आयोजित केला आहे. यावर्षी येत्या ता. २५ ते २७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान हा महोत्सव भरविण्यात येणार असून, यानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वेरूळ-अजिंठा आतंरराष्ट्रीय महोत्सवाची सुरवात ‘पूर्वरंग’ या विशेष कार्यक्रमाने ता. १२ फेब्रुवारी २०२३ पासून होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये सोनिया परचुरे व संच सुप्रसिद्ध बॅले नृत्य सादर करणार आहेत; तसेच सांज अमृताची हा मराठी व हिंदी गाणी, सुफी गाणी यांचा कार्यक्रम गायक शाल्मली सुखटणकर, आशिष देशमुख, मंदार आपटे व माधुरी करमरकर सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दामले करणार आहेत.
‘पूर्वरंग’ या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. रावसाहेब दानवे,(केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे, कोळसा व खाण) आणि मा. ना. भागवत कराड, (केंद्रीय अर्थराज्यमंत्री ) यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. संदीपान भुमरे, (पालकमंत्री तथा मंत्री रोहयो व फलोत्पादन); तसेच या कार्यक्रमासाठी सह अध्यक्ष मा. ना. अब्दुल सत्तार (कृषिमंत्री), मा. ना. अतुल सावे (सहकार व पणन, सामाजिक न्यायमंत्री) व प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. अंबादास दानवे (विरोधी पक्षनेता, विधानपरिषद) यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. संजय मुखर्जी (उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, मुंबई) हे असणार आहेत. यासोबतच जिल्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

तब्बल सात वर्षांनी महोत्सवाचे आयोजन
औरंगाबाद हे पर्यटनस्थळ असल्याकारणाने पर्यटनवाढीस प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून वेरूळ महोत्सवाचे आयोजन वेरूळ येथील कैलास लेणीसमोरील जागेमध्ये वर्ष १९८५ पासून महोत्सव साजरा केला जात असे. कालांतराने २००२ पासून ‘वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव’ असे महोत्सवाचे रूपांतर करण्यात आले. २०१६ मध्ये या मोहत्सवाचे आयोजन झाले होते. विविध कारणांनी मोहत्सवामध्ये खंड निर्माण होत गेल्याने आता तब्बल ७ वर्षांनी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोनेरी महलमध्ये होणार महोत्सव
ता. २५ ते २७ फेब्रुवारीमध्ये हा महोत्सव होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिद्ध कलाकारांमार्फत शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन व शास्त्रीय नृत्य इ. सादर केले जाणार आहे. सदर महोत्सवामध्ये उस्ताद राशीद खान, उस्ताद सुजात खान, महेश काळे, रवी चारी, विजय घाटे, संगीता मुजुमदार व शंकर महादेवन आदी आपली कला सादर करणार आहेत.

असे राहणार तिकीट दर
या महोत्सवासाठी नेमण्यात आलेल्या संयोजन समितीमार्फत तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. महोत्सवासाठी सुरवातीला नि:शुल्क पास असल्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र महोत्सव समितीकडून पाससाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. प्लॅटीनिअम : ६००, गोल्ड : ३००, सिल्व्हर : १५० रुपये प्रतिव्यक्ती याप्रमाणे तीन दिवसांसाठी हे दर लागू राहतील. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यालय आणि संत एकनाथ रंगमंदिर येथे तिकीट उपलब्ध असणार आहेत. या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा शहरवासीयांनी; तसेच शहरात येणाऱ्या पर्यटकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन, संयोजन समिती; तसेच पर्यटन संचालनालयाद्वारे करण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा