OHE विद्युत सेक्शनमध्ये दोन थरांची मालवाहू रेल्वे चालवून भारताने घडवला जागतिक इतिहास

नवी दिल्ली, दि. १२ जून २०२०: भारतीय रेल्वेने पहिल्या कॉन्टॅक्ट वायरची ७.५७ मीटर इतकी जास्त उंची असलेले ओव्हर हेड इक्विपमेंट (ओएचई) बसवून आणि पश्चिम रेल्वेवरील विद्युतीकृत सेक्शनमध्ये द्विस्तरीय कंटेनर चालवून एक नवा जागतिक आदर्श निर्माण केला आहे. संपूर्ण जगात अशा प्रकारची ही एक अभूतपूर्व कामगिरी आहे आणि त्यामुळे भारती रेल्वेचा नवा हरित उपक्रम म्हणून हरित भारत मोहीमेला देखील यामुळे चालना मिळणार आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय रेल्वेने जास्त उंचीच्या ओएचई सेक्शनमध्ये जास्त उंचीवर पोहोचू शकणाऱ्या पेंटोग्राफच्या साहाय्याने दोन थरांची कंटेनर ट्रेन चालवणारी पहिली रेल्वे बनण्याचा बहुमान मिळवला आहे.

या परिचालनाची यशस्वी सुरुवात १० जून २०२० रोजी पालनपूर आणि गुजरातमधील बोताड स्थानकांपासून झाली.

अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये नवनिर्मिती, वेग आणि मालवाहतूक परिचालनातील अनुकूलता यावर भर देण्यात येत आहे. कोविड लॉकडाऊनमुळे बराच वेळ वाया गेल्यानंतरही रेल्वे मंत्रालयाने गेल्या वर्षीच्या मालवाहतुकीची आकडेवारी मागे टाकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

१ एप्रिल २०२० ते १० जून २०२० या काळात भारतीय रेल्वेने देशभरात आपल्या २४ तास मालवाहतूक परिचालनाद्वारे सुमारे १७८.६८ दशलक्ष टनाच्या सामग्रीची वाहतूक केली आहे.

२४.३.२०२० ते १०.६.२०२० दरम्यान ३२.४० लाखांपेक्षा जास्त वॅगनद्वारे पुरवठा साखळी कार्यरत ठेवण्यासाठी सामग्रीची वाहतूक करण्यात आली. त्यापैकी १८ लाखांपेक्षा जास्त वॅगनद्वारे अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल,कांदे, फळे आणि भाजीपाला, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा, खते इ अत्यावश्यक सामग्रीची देशभरात वाहतूक करण्यात आली. एक एप्रिल २०२० ते १० जून २०२० या काळात रेल्वेने १२.७४ दशलक्ष टन अन्नधान्याची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच काळात ६.७९ दशलक्ष टन सामग्रीची वाहतूक करण्यात आली होती. याव्यतिरिक्त २२.३.२०२० ते १०.६.२०२० दरम्यान एकूण ३,८९७ पार्सल ट्रेन देखील चालवण्यात आल्या. त्यापैकी ३७९० ट्रेन वेळापत्रकानुसार धावणाऱ्या होत्या. या पार्सल ट्रेनच्या माध्यमातून एकूण १,३९९९६ टनांच्या सामग्रीची वाहतूक करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा