आसाम, दि.१० जून २०२० : आसाम राज्यातील तीनसुखीया जिल्ह्यामधल्या बाघजान येथील तेलाच्या विहिरीला मंगळवारी (दि.९) रोजी आग लागली. त्या आगीचा झोळ एवढा होता की, सर्वत्र आगडोंब पसरले होते. आग विझवण्यासाठी सिंगापूरहून बोलवलेले पथक ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
बाघजान ऑइल इंडिया लिमिटेडच्या तेलविहिरीत मोठा स्फोट झाल्याने ही भीषण आग लागली. गेल्या १४ दिवसांपासून या तेलविहिरीत वायूगळती होत होती. या वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असतानाच अचानक आग लागली.
या आगीचे लोळ आणि धूर अनेक किलोमीटरपर्यंत दिसत आहेत. आगीचा धोका लक्षात घेऊन हजारो लोकांना यापूर्वीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून प्राण्यांच्या व्यतिरिक्त अन्य ६ नागरिकही जखमी झाले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: