ओमा फाउंडेशन आणि एक्सर बाईक यांच्यावतीने वाहन चालकांच्या सुरक्षितेसाठी जनजागृती व हेल्मेट वाटप, आयुक्तांनी केलं हेल्मेट वापराचं आवाहन

29

पुणे, 28 जून 2022: ओमा फाउंडेशन आणि एक्सर बाईक यांच्यावतीने वाहन चालकांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यासंबंधी जनजागृतीसाठी एक उल्लेखनीय उपक्रम राबवण्यात येत आहे. 27 तारखेपासून या उपक्रमाला सुरुवात झालीय. या माध्यमातून ओमा फाउंडेशन आणि एक्सर बाईक वाहनचालकांना मोफत हेल्मेट वाटत आहेत. याची सुरुवात पुण्यातील कौन्सिल हॉल चौकातून सुरू करण्यात आली.

कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता आणि उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसंच हेल्मेट चे फायदे देखील सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते रोडवर बिना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या नागरिकांना हेल्मेट देखील देण्यात आले.

हा कार्यक्रम पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणांवर सलग चार दिवस घेण्यात येणार आहे. 27 जून रोजी कौन्सिल हॉल चौक, 28 जून रोजी अलका टॉकीज चौक, 29 जून रोजी पुणे युनिव्हर्सिटी चौक आणि 30 जून रोजी कात्रज येथे हे कार्यक्रम होणार आहेत.

यावेळी पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त राहुल श्रीरामे, ओमा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप, उपाध्यक्ष विजय सपकाळ, खजिनदार संजय शेंडगे, कार्याध्यक्ष गायकवाड, कामेश मोदी, एक्सर बाईकचे डायरेक्टर त्रिलोक यादव तसेच पोलीस खात्यातील अनेक अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

आयुक्त गुप्ता यांनी पुण्याबाबत आपला अनुभव सांगताना म्हटलं की, मला अनेक वेळा निदर्शनास आलं की, पुण्यातील सायकल चालक हे मोटरसायकल किंवा स्कूटर चालक यांच्या पेक्षा जास्त दक्ष व सुरक्षेची काळजी घेताना दिसतात. तुलनेत मोटर सायकल चालत किंवा स्कूटर चालक रस्त्यावर वाहन चालवताना फारशी काळजी घेताना दिसत नाहीत. सायकल चालक हेल्मेट, नी कॅप घालताना दिसतात तर मोटर सायकल चालक वाहन बिना हेल्मेटचेच चालवताना दिसतात.

यावेळी उपायुक्तांनी देखील दर वर्षी अपघातामुळं किती लोकांना आपला जीव गमवावा लागतो हे देखील आकडेवारीच्या स्वरूपात सांगितलं. त्यांनी सांगितलं की, भारतात दरवर्षी अपघातात एक लाखाच्या आसपास लोकांचा मृत्यू होतो. तर 4.5 लाख लोकं अपघातामध्ये जखमी होतात. पुण्याबाबत मागील दोन वर्षांचा आढावा सांगताना ते म्हणाले की, 2020 मध्ये 143 लोकांचा अपघातात मृत्यू झाला. यापैकी 80 लोकं टुविलर चालक होते. या 80 लोकांपैकी केवळ 8 लोकांनीच हेल्मेट घातलं होतं तर इतर 72 लोकांनी हेल्मेट घातलं नव्हतं. 2021 मध्ये 255 लोकं अपघातामध्ये मृत्युमुखी पडले. त्यापैकी 128 चालक टू व्हीलर वरती ड्राईव्ह करत होते. त्यातील 116 लोकांनी हेल्मेट घातलं नव्हतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे