ओमर अब्दुल्ला, फारूख अब्दुल्ला यांची नॅशनल काँफरन्सच्या नेत्यांनी घेतली दोन महिन्यांनी भेट

जम्मू-काश्मीरमधल्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या एका शिष्टमंडळाने रविवारी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची श्रीनगरमधल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

या शिष्टमंडळाने फारूख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांचीही हरी हाउसमध्ये जाऊन भेट घेतली.

जम्मू-काश्मीरमधून जवळपास दोन महिन्यांपूर्वी कलम 370 रद्द करण्यात आलं होतं. तेव्हापासून फारुख अब्दुल्ला नजरकैदेत आहेत.

या दोन्ही नेत्यांशी भेट घेतल्यानंतर पक्षाचे नेते देवेंद्र राणा यांनी एएनआयएला सांगितलं की दोन्ही नेते ठीक आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, राज्यात करण्यात आलेल्या कारवाईमुळे त्यांना दुःख झालं आहे.

या शिष्टमंडळात नॅशनल कॉंफरन्सचे इतर नेते हसनैन मसूदी आणि अकबर लोण हेदेखील होते. त्यांनी फारूख अब्दुल्ला आणि त्यांच्या पत्नी मौली यांची भेट घेतली.

पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या पक्षाचं शिष्ट मंडळ उद्या जाणार आहे, अशी माहिती एएनआयनं दिली आहे.

राज्यात राजकीय कारभार सुरळीत व्हावा वाटत असेल तर स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका करावी लागेल, असं या नेत्यांनी एएनआयला म्हटलं आहे.

माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचा फोटो तब्बल दोन महिन्यांनंतर दिसला आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आहे. या फोटोत ते आनंदी दिसत आहेत. इतर काही फोटोंमध्ये शिष्टमंडळातल्या नेत्यांची ते उत्साहात भेट घेत असल्याचं दिसतं.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आलं. तेव्हापासून राज्यातले इतरही अनेक नेते नजरकैदेत आहेत. यात पिपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आणि तसंच फारूख आणि उमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. राज्यात संचारबंदीही अजून लागू आहे. मात्र, काही ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तसंच राज्याचा कारभार आता राज्यपालांच्या हातात आहे.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नॅशनल कॉन्फरंसच्या 15 नेत्यांच्या शिष्टमंडळाला त्यांचे ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांना भेटण्याची परवानगी दिली.

 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा