नाशिकला जाताना नमाजची वेळ झाल्याने ओवैसी एका वस्तीवर थांबले; लोक म्हणाले, ‘तुम्हाला कुठंतरी पाहिलंय’

पुणे, ५ जानेवारी २०२३ : ‘एमआयएम’चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी बुधवारी (ता. चार) औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने जात असताना सायंकाळच्या नमाजची वेळ झाल्याने कोपरगाव तालुक्यातील एका वस्तीवरील मशिदीमध्ये मगरिबची नमाज पठणासाठी थांबले; पण तेथील लोकांनी असदुद्दीन ओवैसी यांना ओळखलंच नाही. ‘आपको कहीं देखा है’ म्हणत सुरवातीला स्थानिकांनी त्यांना ओळखलं नाही; मात्र हे ‘ओवैसी साहब’ असल्याचं समजल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एमआयएम पक्षाच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये सडेतोड भूमिका मांडणाऱ्या खासदार ओवैसींनी एमआयएम या पक्षाचा देशभरात, विशेषतः मुस्लिम समाजात विस्तार करण्यात बऱ्याच अंशी यश मिळवलं आहे. पक्षाच्या कामानिमित्त ते देशभर दौरे करीत असतात. बुधवारी (ता. चार) औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने जात असताना सायंकाळच्या नमाजची वेळ झाल्याने ओवेसी यांची गाडी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील एका छोट्याशा वस्तीवरील मशिदीसमोर थांबली. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलीलही होते. दोघेही अनपेक्षितपणे त्या मशिदीमध्ये नमाज पठणासाठी पोचले असता तेथे उपस्थित मुस्लिम बांधवांनी त्यांना ओळखलेच नाही.

नमाज संपल्यावर सर्वजण कुतूहलाने दोघांकडे बघत असताना, काही लोक त्यांच्या जवळ आले आणि ‘आपको कहीं देखा है’ म्हणत विचारपूस करू लागले; मात्र काहींना हे ‘ओवैसी साहब’ असल्याचे समजताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खासदार असदुद्दीन ओवैसी स्वतः आपल्या छोट्याशा वस्तीवरील मशिदीमध्ये आल्याने स्थानिक लोक भारावून गेले. लगेचच धावपळ करीत शाल आणली आणि खासदार ओवैसी आणि खासदार जलील यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा