गोल पोस्ट गुन्हा चौसाळा-बीड रोडवर पोलिसांनी ३६ लाखांच्या गुटख्यासह ५१ लाख २० हजारांचा माल पकडला;...

चौसाळा-बीड रोडवर पोलिसांनी ३६ लाखांच्या गुटख्यासह ५१ लाख २० हजारांचा माल पकडला; दोघे ताब्यात

बीड, ४ फेब्रुवारी २०२३ : चौसाळा ते बीड रोडवर आज शनिवारी (ता. ४) उदंड वडगाव येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. कारवाईत पोलिसांनी गुटख्यासोबत ट्रक आणि मोबाईलसह एकूण ५१ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

याबद्दलची अधिकची माहिती अशी, की आज पहाटे गुटखा घेऊन जाणारा ट्रक (जीजे १२, एवाय ९४२५) सोलापूर ते बीड रोडने मांजरसुंबा मार्गे बीड येथे बसवकल्याण येथून जात होता. आज पहाटे चौसाळा ते बीडला जाणाऱ्या रोडवर उदंड वडगाव रोडवर हा ट्रक पोलिसांनी पकडला. या कारवाईत ट्रकचालक वजीर इम्रान गुल मोहम्मद व समीर सुलेमान नोतियार यांना ताब्यात घेतले आहे.

ट्रकमध्ये गोवा गुटख्याची १६० पोती होती. त्याची किंमत अंदाजे ३६ लाख रुपये. ट्रकची किंमत पंधरा लाख रुपये, दोन मोबाईल २०,००० रुपये असा एकूण ५१ लाख वीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नेकनूर येथे पोलिस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, विकास चोपणे, संजय टुले यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version