सीआरपीएफच्या ८४ व्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह जगदलपूर मध्ये दाखल, म्हणाले- नक्षलवाद्यांचा खात्मा सीआरपीएफमुळंच

10

बस्तर, २५ मार्च २०२३: सीआरपीएफ आज छत्तीसगडमध्ये आपला ८४ वा स्थापना दिवस आयोजित करत आहे. येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, जीव धोक्यात घालून येथे सेवा करणाऱ्या जवानांना मी सलाम करतो. आज ऑल इंडिया रेडिओची सेवा हलबी भाषेत सुरू झालीय. स्थानिक लोकांना त्यांच्या भाषेत याची माहिती मिळू शकणार आहे. हे कौतुकास्पद काम आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी परेडची सलामी घेतली, त्यानंतर शहीद जवानांच्या पत्नींना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कोब्रा बटालियनतर्फे करणपूर कॅम्प येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

कार्यक्रमाला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, मी बस्तरमध्ये उभा आहे आणि तुमच्यामध्ये बोलत आहे. आज बस्तरमध्ये जे नक्षलवादी उद्ध्वस्त होत आहेत ते सीआरपीएफमुळंच आहेत. अमित शहा म्हणाले की, मी देशात कुठंही राहतो, कोणतीही अनुचित घटना घडली तर काही फरक पडत नाही, परंतु सीआरपीएफ तेथे पोहोचल्याचं समजताच मी निश्चिंत होऊन माझं काम सुरू करतो. सीआरपीएफबद्दल माझा हा विश्वास आहे.

त्याचवेळी शहा यांनी कार्यक्रमात सांगितलं की, सीआरपीएफचा जन्म देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी केला. जिथे सीआरपीएफची सुरुवात एका बटालियनमधून करण्यात आली होती. तर आज देशाच्या कानाकोपऱ्यात त्याची स्थापना झालीय. गेल्या ९ वर्षांत सुरक्षा दलांनी डाव्या विचारसरणीला रोखण्यात मोठं यश मिळवलंय. विकासाच्या सर्व कामांवरून डाव्या अतिरेक्यांचा प्रभाव हटवण्यात आणि विकासाला गती देण्यात सीआरपीएफचा मोठा वाटा आहे.

विशेष म्हणजे सीआरपीएफच्या इतिहासात पहिल्यांदाच सीआरपीएफ चा स्थापना दिन नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जगदलपूर कॅम्पमध्ये सैनिकांसोबत रात्र घालवत आहेत, त्यामुळं जवानांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यादरम्यान अमित शहा फॉरवर्ड पोस्टलाही भेट देणार आहेत. जिथं जवान वाईट परिस्थितीत काम करतात, त्याचा आढावा घेतील. यासोबतच सरकारने सैनिकांना त्यांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा