पादचारी दिनानिमित्त सोमवारी ११ डिसेंबरला पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरती ‘वॉकिंग प्लाझा’, राबविले जाणार विविध उपक्रम

पुणे १० डिसेंबर २०२३ : पादचारी दिनानिमित्त सोमवारी ११ डिसेंबरला पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक आणि गरूड गणपती चौकदरम्यान पादचाऱ्यांसाठी ‘वॉकिंग प्लाझा’चे नियोजन करण्यात आले आहे. सेवासदन चौकापासून उंबऱ्या गणपती चौक आणि गरूड गणपती चौकापर्यंत सर्व वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहील. ‘वॉकिंग प्लाझा’च्या दिवशी लक्ष्मी रोडवरून धावणाऱ्या बसेसच्या मार्गांत बदल करण्यात आला आहे. लक्ष्मी रोडवर, उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक या बसेसच्या मार्गात सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बदल राहणार आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘वॉकिंग प्लाझा’च्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावर सोमवारी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने जातील. कुमठेकर रस्त्यावरून लक्ष्मी रस्त्याकडे जाणारी वाहने चितळे कॉर्नर डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने जातील. रमणबाग चौकातून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहने लक्ष्मी रस्त्याकडे न जाता सरळ केळकर रस्त्याने टिळक चौकमार्गे जातील. निंबाळकर तालीम चौकाकडून कुंठे चौकाकडे जाणारी वाहने लक्ष्मी रस्त्याने न जाता केळकर रस्त्याने टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौकदरम्यान वाहतुकीच्या परिस्थितीनुसार आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

पादचारी दिनानिमित्त सोमवारी लक्ष्मी रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी ‘वॉकिंग प्लाझा’ असून, यादरम्यान नागरिकांसाठी दिवसभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये सेव किड्स फाउंडेशन तर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षा बाबत कार्यशाळा, एकांश ट्रस्ट तर्फे अंध अपंग नागरिक यांच्याबाबत संवेदनशीलता व सार्वत्रिक प्रवेश विषयक कार्यशाळा, सेव पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट तर्फे पादचारी अधिकारांबाबत कार्यशाळा, परिसर संस्थेमार्फत सार्वजनिक वाहतूक व जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शन, आईटीडीपी संस्थेमार्फत रस्त्यांच्या योग्य रचनेबाबत पुणे मनपाने केलेल्या कामांचे पॅनल प्रदर्शन, साथी हाथ बढाना संस्थेमार्फत मानसिक आरोग्याबाबत पथनाट्य, रंग कला अकादमी तर्फे पादचारी दिनाबाबत भव्य रांगोळी, इतिहास प्रेमी नागरिकांसाठी शौर्य खेळ, रास्मा संस्थेमार्फत संगीत व वाद्य कला सादरीकरण, पर्यावरण विभागामार्फत हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थेमार्फत प्रदर्शन असे उपक्रम असणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा