पिंपरी, ता. २जानेवारी २०२२ ः ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘महिला शिक्षण दिन’ साजरा करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने मंगळवारी (ता. तीन) पिंपरीत ‘विचार प्रबोधन पर्वा’चे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले स्मारकात विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ‘विचार प्रबोधन पर्वा’चे उद्घाटन प्रशासक शेखर सिह यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले स्मारकात होईल. तत्पूर्वी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी साडेदहा वाजता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. त्यानंतर तळमजल्यावर चित्रकार विजय शिंदे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर मोशी येथील महापालिकेच्या शाळेमधील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल.
सावित्रीबाई फुले स्मारकातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सकाळी ११ ः ‘विचार प्रबोधन पर्वा’च्या उद्घाटनास महिला बचत गट व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. सकाळी ११.३० ः ‘मी तुमची सावित्रीबाई फुले’ हा एकपात्री नाट्यप्रयोग मेघना झुझम सादर करतील. दुपारी १२.३० ः ‘सावित्रीच्या ज्योती’ सांस्कृतिक कार्यक्रम रितेश नगराळे सादर करतील. दुपारी २ ः निमंत्रितांचे कविसंमेलन. दुपारी ४.३० ः ‘सावित्रीच्या लेकी’ विषयावर परिसंवाद. सायंकाळी ६ ः ‘वंदन ज्ञानज्योतीला’ संगीतमय कार्यक्रमाद्वारे ‘विचार प्रबोधन पर्वा’ची सांगता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील