पिंपरी चिंचवड, १३ एप्रिल २०२३: श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त पुण्यातील सुसगाव येथे ‘काळभैरवनाथ केसरी’ राज्यस्तरीय कुस्त्यांच्या स्पर्धा काल पार पडल्या. समस्त सुस गावकरी आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत खुल्या गटात मानाची चांदीची गदा आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस पैलवान ‘साकेत यादव’ यांनी पटकावलं. अंतिम सामना साकेत यादव आणि मुन्ना झुंजूरके यांच्यात झाला.
लाखो रुपयांची बक्षिसं या ‘काळभैरवनाथ केसरी’ स्पर्धेत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. ५७ किलो गटात रमेश इंगवले, ६१ किलो विक्रम कुऱ्हाडे, ६५ किलो नामदेव कोकाटे, ७० किलो निखिल कदम, ७४ किलो राकेश तांबूळकर, ७९ किलो रवी चव्हाण आणि ८६ किलो गटात आशिष वावरे यांनी बाजी मारली.
या स्पर्धेचं आखाडा पूजन पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते तर बक्षिस वितरण, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संग्रामदादा थोपटे, शिवसेना नेते सचिनभाऊ अहिर, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस चे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे गजानन थरकुडे यांच्या उपस्थितीत झाले. ही स्पर्धा आणि श्री काळभैरवनाथ यात्रा समस्त सुसगाव ग्रामस्थांच्या पुढाकाराने यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे.