पुरंदर, दि. २० जुलै २०२०: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या संपन्न होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी मधील सोमवती यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र परंपरेप्रमाणे श्रींच्या उत्सव मूर्तींचे विधिवत पूजा व जलाअभिषेक करण्यात आले. निवडक पुजाऱ्यांच्या व मानक-यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला
जेजुरीचा खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. लाखो भाविक या जेजुरीत नेहमीच येत असतात. येथे उधळला जाणारा भंडारा खोबरे, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडा-याच्या उधळीनेने आसमंताला आलेले हे पिवळेपणाचे दृश्य जेजुरीत नेहमीच पहायला मिळते.
सोमवती यात्रा असली की परंपरेनुसार क-हे स्नानासाठी गडकोट आवारातून प्रस्थान होणारा पालखी सोहळा आणि लाखो भाविक हे नेहमीचे चित्र यावेळी पहायला मिळाले नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा जरी रद्द करण्यात आली असली तरी नित्य सेवेकरी, पुजारी, मानकरी यांचे हस्ते सोमवती उत्सवाचे श्रींचे सर्व धार्मिक विधी आणि क-हेच्या पाण्याने उत्सव मूर्तीना स्नान निवडक लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
भक्तांविना देवाचा दरबार सुना पडला होता. सोमवतीला राज्यभरातून जेजुरीत लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा मात्र खंडेराया सोमवती यात्रा रद्द झाल्याने लोकांनी घरात राहूनच खंडोबाला प्रार्थना करणे पसंद केले आहे. लोकांना त्रास देणाऱ्या त्या मणी मल्याचा वध देवा आपण केलात आता या कोरोनाचा सुद्धा वध कराच. हेच साकडं लोकं आपल्या कुलदैवताला घालत असतील. लवकर कोरोना जाऊदे आणि तुझ्या दर्शनाचे भाग्य आम्हाला मिळू दे अशी अपेक्षा लोक देवाकडे व्यक्त करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे