जागतिक महिला दिनानिमित्ताने डाॅ. मनोहर देसाई यांनी सुलेखन चित्राद्वारे महिलांना केले अभिवादन

निगडी, १० मार्च २०२३ : ‘तू आई, तू ताई, रंग तुझे अनोखे, शक्ती तू, स्त्री तू, साऱ्या जगताला सामावून घेई!’ चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते आले होते; पण प्रदर्शनाचे उद्घाटन वेगळ्या पद्धतीने म्हणजेच सुलेखनचे प्रात्यक्षिक देऊन करायचे त्यांनी ठरविले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार, प्रसिद्ध चित्रकार, लेखक आणि कलाध्यापक डॉ. मनोहर देसाई यांच्या कुंचल्यातून उमटणारी अक्षरे पाहायला इझलवर कॅनव्हासही उत्सुक होता. विविध आकारांचे ब्रश आणि ॲक्रॅलिक रंग तयार होतेच. दोन-चार उभ्या आणि दोन-चार आडव्या रेषांचे स्ट्रोक्स अतिशय प्रमाणबद्ध पद्धतीने कॅनव्हासवर उमटले. पाच-सहा चौकटी तयार झाल्या. लगेचच साकारलेले लाल-तांबड्या रंगातील दोन ठसठशीत वर्तुळ लक्ष वेधून घेत होते. सरांच्या सिद्धहस्त स्ट्रोकमधून पहिले अक्षर रेखाटले गेले ‘तू’! ही ‘तू’ कोण असेल ही उत्सुकता होतीच. मग एकापाठोपाठ एक एक अक्षरे लीलया स्ट्रोक्समधून उमटत गेली. ‘तू’, ‘आई’, ‘ताई’ ‘सौ.’, ‘कन्या’ आणि शेवटी ‘आजी’. सुंदर शैलीदार अक्षरांनी कॅनव्हास साजरा झाला होता. आता उत्सुकता होती सर कोणते रंग आणि कसे भरतील त्याची.

निमित्त होते जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्मृतिरंग ७५’तर्फे आयोजित ४ महिला चित्रकारांच्या चित्रप्रदर्शनाचे. श्री. देसाई सरांनी प्रदर्शनात सहभागी ४ महिला चित्रकार व उपस्थित १५ ते २० महिला चित्रकांरांना विविध चौकटीत आवडीचे रंग भरण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनीही नजाकतीने तांबडा, जांभळा, आकाशी, पिवळा, केशरी असे विविध रंग भरले आणि कॅनव्हास आणखी सुंदर दिसू लागला. नंतर सरांनी एका चिमुकलीला बोलावून बोटांनी रंग भरायला सांगितले. ती तर जामच खूश झाली आणि बोटाने असा काही रंग लावला की उपस्थितांनी कौतुकाने टाळ्या पिटल्याने वातावरण भारून गेले होते.

श्री. देसाई सरांच्या कुंचल्यातून कॅलिग्राफी फिनिशिंगचे शेवटचे फटकारे उमटू लागले, बॉर्डरपट्टी, त्यावरील मोहक रंगातील मुक्त स्ट्रोक्स यामुळे कलाकृती आणखी भन्नाट दिसू लागली. खालच्या कोपऱ्यात ‘आजी’ या अक्षरांच्या कुशीत ‘मी’ ही अक्षरे उमटली आणि उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. सरांच्या सिद्धहस्त कलाकारीने मोजून अवघ्या १५- २० मिनिटांत हा चमत्कार घडवला होता.

डॉ. मनोहर देसाई यांच्या सान्निध्यात कलेचा अनुभव घेत यावर्षीचा जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करणं हा एक विलक्षण अनुभव होता. जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिलावर्गास अतिशय सुंदर अशा सुलेखन कलाकृतीद्वारे अनोखी मानवंदना दिली गेली.

या कार्यक्रमाचे निमित्त होते संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीतर्फे आयोजित ‘स्मृतिरंग ७५, पुष्प २४’चे उद्घाटन. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार सौ. प्रणाली हरपुडे या उपस्थित होत्या. या प्रदर्शनात राधिका दुर्गाडे, शीतल नाकवा गोयर, प्रीती आनंद व अपर्णा आढाव या ४ महिला चित्रकारांच्या सुंदर कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. उद्घाटनप्रसंगी संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी डॉ. श्री. मनोहर देसाई यांचे स्वागत केले, तर
सचिव सौ. लीना आढाव यांनी सौ. प्रणाली हरपुडे यांचे स्वागत केले.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या विशेष प्रदर्शनासाठी संस्कार भारतीच्या पिंपरी-चिंचवड परिसरातील १५ ते २० महिला चित्रकार याप्रसंगी उपस्थित होत्या. या सर्वांचे पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्नेहा आमले हिने केले.
कार्यक्रमासाठी भोग्या संख्येने कलारसिक उपस्थित होते.

हे कलाप्रदर्शन बुधवारपासून (ता. ८) ते रविवारपर्यंत (ता.१२) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स कलादालन, चाफेकर चौक, चिंचवडगाव, पुणे विनामूल्य खुले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी कलाप्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा