लोणी काळभोर, दि. २६ एप्रिल २०२०: हवेली तालुक्यासह थेऊर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन या परिसरातील किराणा दुकानदार चढ्या भावाने किराणा मालाची विक्री करत असल्याचे आढळून आले आहे.
लॉकडाऊन व संचारबंदीची संधी साधत या भागातील काही किराणा दुकानदार जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करीत आहेत. यासंबंधी अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कठिण प्रसंगी प्रशासनाने किराणा दुकानदारांची बैठक घेऊन सर्वसामान्य ग्राहकांची होणारी लूटमार थांबवावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
आज संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जवळपास महिन्याभरापासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. याची संधी साधून काही किराणा दुकानदार चढ्या दराने माल विक्री करीत आहेत. सर्व किराणा दुकानात भाव फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून ग्राहकाला हवी असलेली वस्तू न देता दुसऱ्याच कंपनीची वस्तू देण्याचेही प्रकार घडत आहेत.
किराणा वाहतूक भाड्यात वाढ झाल्याचे, अनेक व्यापारी वर्गाकडूनच दर वाढवून येत असल्याने तसेच मालाचा तुटवडा असल्याची कारणे देत काही व्यापार्यांकडून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्यात येत आहे.
वास्तविक सहा महिने धान्य तुटवडा भासणार नाही असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले आहेत. शिवाय काळाबाजार तसेच चढ्या दराने विक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत सूचनाही दिलेल्या आहेत. तरिही असे प्रकार या परिसरात घडत आहेत.
येणाऱ्या काळात कोणी काळाबाजार करून व चढ्या दराने मालाची विक्री करीत असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित दुकानदारावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी हवेली तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे