याच दिवशी भारत बनला होता पहिल्यांदा क्रिकेट मधील विश्वविजेता

पुणे, दि. २५ जून २०२० : आजपासून ३७ वर्षांपूर्वी २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने आपला पहिला विश्वचषक जिंकला होता. क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदा विश्वविजेता बनला आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटचे भविष्य बदलून गेले. १९८३ च्या ‘त्या’ अखेरच्या सामन्यात भारताने दोन वेळच्या वर्ल्ड कप विजेता वेस्ट इंडिजचा पराभव केला होता.

त्यानंतर आता ३७ वर्षे उलटून गेली आहेत पण कपिलच्या चेह-यावरील हास्य आणि हातात धरलेला वर्ल्ड कप चाहत्यांना अजूनही आठवत आहे. अंतिम सामन्यात भारत फक्त १८३ धावांवर ऑलआऊट झाला होता, त्यामुळे खेळाडूंसोबत चाहत्यांनाही त्यांच्या विजयाची आशा नव्हती. मात्र, कपिल देवच्या कुशल नेतृत्वाने आणि टीमच्या इतर खेळाडूंनी आपल्या खेळाने पराभवाच्या तोंडून विजय खेचून आणला.

दर चार वर्षांनी जेव्हा विश्‍वकरंडक आयोजित केला जातो तेव्हा टीव्ही स्क्रीनवर हे विलोभनीय दृश्य नेहमीच दाखवले जाते. इंग्लंडमधील लॉर्ड्स येथे झालेल्या १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने वेस्ट इंडीजच्या मजबूत संघाला ४३ धावांनी पराभूत केले. केवळ १८३ धावांवर आऊट झालेल्या भारतीय संघाने वेस्टइंडीजला केवळ १४० धावांवर ऑल आऊट केले होते. त्यामुळे हा सामना खूप रोमांचक बनला होता. या विजयासह विश्वचषकमध्ये भारताने विश्‍वकरंडक मध्ये आपली पहिली बाजी मारली होती .

कपिल देव, संदीप पाटील, मदनलाल, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, रॉजर बिन्नी बलविंदर संधू यांनी वैयक्तिकरित्या स्पर्धेत आपली प्रभावी कामगिरी केली. विशेष म्हणजे, २०११ वर्ल्ड कप विजेत्या संघातील प्रत्येक सदस्याला बीसीसीआयने दोन कोटी रुपये दिले होते, परंतू १९८३ विश्वचषक विजेते खेळाडू इतके भाग्यवान नव्हते. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप मिळवला होता. पण या कामगिरीबद्दल तेव्हा खेळाडूंना केवळ पंचवीस हजार रुपये बोनस म्हणून देण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा