अमरावती, २९ नोव्हेंबर २०२२ : परीक्षेत अपेक्षेपेक्षा गुण कमी मिळाले, परीक्षा पास होण्यास पात्र ठरलो नाही, आई-बाबांची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. या वर्षात अनेक कारणांमुळे शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी आत्महत्या करीत असण्याची उदाहरणे काही कमी नाहीत. अशीच एक घटना घडली आहे अमरावती येथील भातकुली तालुक्यातील वीरशी येथे. २७ नोव्हेंबर रोजी गायत्री तुकाराम शेंडे हिने घरी कोणी नसल्याची संधी साधत आत्महत्या केली आहे.
गायत्री हिला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. दहावीमध्ये अपेक्षेनुसार गुण न मिळाल्याने तिला विज्ञान शाखेत प्रवेश घेता आला नाही. किंवा गुणपत्रिकेतील गुणांमुळे किंबहुना तो प्रवेश तिला मिळाला नाही. आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न संपुष्टात आल्याने तिच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. ती एकाकी राहू लागली. वैफल्यग्रस्त झाली. आणि अखेर तिने घरी कोणी नसल्याची संधी साधत जीवनयात्रा संपवली. गायत्रीसारखे अनेक विद्यार्थी कमी पडलेल्या गुणांवरून आत्महत्येचाच मार्ग निवडतात.
गायत्री तुकाराम शिंदे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून २८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांना मानसोपचाराची गरज आहे, हे स्पष्ट होतं. शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि पालक या दोन्हीवर्गांना मार्गदर्शनाची गरज आहे, हे समजून घेऊन योग्य ती पावले उचलणे ही काळाची गरज असल्याचे दिसून येते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे