माढा, दि. ४ सप्टेंबर २०२०: माढा तालुक्यातील आढेगांव येथील अण्णासाहेब श्रीपतराव पाटील यांच्या शेतातून जाणारी एच. टी. लाईनची तार तुटल्याने वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे आठ महिन्यांचे उसाचे एक एकराचे पिक जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आढेगांव येथे ३३/११ के.व्ही चे महावितरणचे सब स्टेशन असून येथून आढेगाव व परिसरातील घरगुती व शेतीपंपासाठी वीज पुरवठा केला जातो अण्णासाहेब पाटील यांच्या शेतात १०० के.व्ही चा ट्रांसफार्मर असून या ट्रांसफार्मरमधून भिमानगर येथे लाईन जाते. गुरुवार दिनांक ३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान एच.टी. लाईनची तार तुटून विजेचे गोळे पडू लागले. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांचे शेतातील ऊसाने पेट घेतला परंतु क्षणार्धात रवी शेळके,आप्पाराव वाघ, नागनाथ इंगळे, अश्विन पाटील’ सुहास पाटील’ गणेश शिंदे’ सुरज निकम, साहेबराव पारेकर देवकाते, तुषार भुजबळ, समीर वाघ, तेजस पाटील या युवकांच्या प्रसंगावधानामुळे उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले.
तरुणांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आली. तरीही सदर शेतकऱ्याचा एक एकर ऊस जळाल्याने मोठे नुकसान झाले. या अगोदरही वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या शेतकऱ्याचा तीन वेळा ऊस जळाला आहे. वीज वितरण कंपनीच्या अशा गलथान कारभारावर शेतकऱ्यांतून रोष व्यक्त केला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील