बारामती (माळेगाव), १० जानेवारी २०२१: माळेगाव बुद्रूक येथे रात्री गस्त घालत असताना चोरीच्या प्रयत्नात दबा धरून बसलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. महमंद रुस्तम सय्यद (वय ३२, रा.माळेगाव) पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी बारामती तालुका ठाण्यातील पोलीस कर्मचारी योगेश चितारे यांनी फिर्याद दिली आहे. चितारे व पोलीस सहकारी दि. ७ रात्री माळेगाव गावातील झैलसिंग रस्त्याने गस्त करत असताना राजहंस इमारती जवळ असणाऱ्या महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमच्या शेजारी एक व्यक्ति अंधारात दडून बसल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी बॅटरीच्या उजेड करुन आवाज दिला असता त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्याला पकडून झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे स्क्रू ड्रायव्हर आढळला. रात्रीच्या वेळी एटीएमजवळ काय करत होता अशी विचारणा पोलिसांनी केली.
परंतु, त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. घरफोडी, चोरी करण्याच्या उद्देशानेच तो बसला असल्याचे चितारे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार जयंत ताकवणे अधिक तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव