पुणे, दि. ११ जून २०२० : गेल्या काही दिवसात औंध भागामध्ये रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. एप्रिल महिन्यापर्यंत औंध मध्ये कोविड -१९ चा कुठलाही संसर्ग या भागात झाला नव्हता मात्र मे महिन्याच्या अखेरीस खासकरून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या भागांमध्ये कोविड -१९ च्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यात काल औंध मधील एका कोविड -१९ पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण औंध मधील असला तरी सध्या तो येथे राहत नसल्याने औंध मधील लोकांना घाबरण्याचे कारण नाही. गेले दहा ते बारा दिवस सदर व्यक्ती इतरत्र राहत होती. या व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत होता तसेच लिव्हरचा देखील त्रास असल्याचे सांगण्यात आले आहे. त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले होते. काल सकाळी ८ च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पुणे शहरात काल दिवसभरात ३०४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्याच बरोबर कोविड -१९ मुळे काल पुण्यात ३ जणांचा मृत्यू झाला. काल सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमधील ससून ११, नायडू २२७, खाजगी ६६ इतके रूग्ण आढळून आले. शहरामध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी २१४ रुग्ण गंभीर आहेत तर व्हेंटिलेटरवर ४३ रुग्ण आहेत. शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या २५२८ आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे