खोपोली, ५ नोव्हेंबर २०२०: खोपोलीतील एका रासायनिक उत्पादन उद्योगातील रिअॅक्टरचा स्फोट होऊन तीन ते चार सुरक्षा रक्षक जखमी झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट खोपोली मधील साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या लघू उद्योग जसनोवा केमिकल मध्ये रात्री २.३० च्या सुमारास झाला. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळं आजूबाजूच्या कंपन्यांची शेड देखील उडून गेले. ह्या कंपनी शेजारी पेट्रोसोल नावाची कंपनी आहे. याच कंपनीतील एका सुरक्षारक्षकाच्या पत्नीचा स्फोटामुळं जागीच मृत्यू झाला. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या भीषण स्फोटानंतर आग लागल्याची माहिती मिळताच खोपोली नगरपरिषद, एचपीसीएल, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, कर्जत नगरपरिषद आणि पेण नगरपरिषदेच्या एकूण १० फायर ब्रिगेड टीमनं चार तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियत्रंण मिळविलं. स्फोटाचा आवाज कानावर पडताच परिसरातील ग्रामस्थांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. शेजारील अनेक लघू उद्योगातील कामगारांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी हलविले.
या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, या स्फोटाचा तीन-चार किलोमीटरच्या परिसरात मोठा आवाज झाला. तसंच आर्कोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या तसंच अनेक कंपन्यांच्या काचा तुटल्या, पत्र्यांचे शेड कोसळले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे