पुणे, १० ऑगस्ट २०२३ : पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात शाळेच्या बसचा देखील समावेश आहे. यामध्ये एकजण जागीच ठार झाला असून कार मधील तीन जण, तर स्कूल बस मधील पाच शाळकरी मुलं किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कात्रज कोंढवा रोडवरील कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ आज सकाळच्या सुमारास पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोराची धडक दिली या घटनेत एक जण जागीच ठार झाला असून कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या बसमधील पाच मुलं किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्कूल बस वाहन चालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टाळला आहे.
या घटनेमुळे सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी या रस्त्यावर झाली आहे. कात्रज कोंढवा रोड हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून अनेक वर्षांपासून या रस्त्यावर अपघाताच सत्र सुरूच आहे, मात्र प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर