जालना, २६ डिसेंबर २०२३ : जालन्यातील मंठा-लोणार दिंडी महामार्गावर कारची डिव्हायडरला धडक बसुन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी फाट्यावर हा भीषण अपघात घडलाय. या अपघातात कारचालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार कार क्रं.एम.एच २० सीएस ९२६१ मंठ्याकडुन लोणारकडे निघाली होती. यावेळी तळणी फाट्याजवळील डिव्हायडरला भरधाव कार ने जोरदार धडक दिली. या धडकेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. रोहन राजु सोसे (वय ३५) रा.लोणार, जि.बूलढाणा असं मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. तर या दुर्दैवी घटनेत दोन जण जखमी झाले. रघुवीर रामा पवार व शुभम मनोहर शेटे (रा. लोणार, जि.बुलढाणा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
परिसरातील नागरिकांनी या अपघाताची माहिती तात्काळ मंठा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी संपर्क साधुन जखमींना अधिक उपचारासाठी लोणारकडे हलविले. दरम्यान या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी