एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात सोडलेल्यांमध्ये एकजण राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळचा, फडणवीसांचा गौप्यस्फोट

नागपूर, 10 ऑक्टोंबर 2021: क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईसंदर्भात आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एनसीबीने जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आलं. काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून दिलं. मात्र तो क्लीन होता, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

नागपूर मध्ये बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस हे नागपूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मात्र हा गौप्यस्फोट करताना फडणवीस यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. फडणवीस म्हणाले की, एनसीबीने क्रूझवर कारवाई करताना अनेक लोकांना पकडले. यातील जे लोक क्लीन होते त्यांना एनसीबीने सोडून दिले. मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होते, त्यांना मात्र एनसीबीने अटक केली. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. अशा गोष्टीच्या विरोधात एखादी संस्था जर काम करत असेल तर त्या यंत्रणेच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. पण या प्रकरणात राजकारण केले जात असल्याचे दिसत आहे, असे म्हणत फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला.

हा गौप्यस्फोट करताना फडणवीस म्हणाले की, खरे म्हणजे ज्या लोकांना सोडण्यात आले, त्या लोकांमध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस होता. पण तो क्लीन होता, त्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे बरोबर नाही. मात्र, ते कुठल्या पक्षाचे होते की नाही हा मुद्दाच येत नाही.

तसेच पुढे बोलताना, त्यांनी नवाब मलिक यांच्यावरदेखील टीका केली. एनसीबीचे खच्चीकरण करण्यात येत आहे का ? असे विचारताच त्यांनी नवाब मलिक यांचे दुखणे वेगळे आहे. त्याविषयी मी याआधीही बोललेलो आहे, असे खोचक वक्तव्य फडणवीसांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा