जम्मू-काश्मीर, १३ सप्टेंबर २०२३ : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला आहे. याशिवाय पोलीस एसपीओसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. चकमकीत केंट, २१ आर्मी श्वान युनिटमधील भारतीय लष्कराच्या श्वानाचाही मृत्यू झाला आहे.
जसविंदर सिंग असे शहीद झालेल्या जवानांचे नाव असून तो २१ राष्ट्रीय रायफल्सचा जवान आहे. उपनिरीक्षक मोहम्मद अश्रफ, काॅन्स्टेबल मोहम्मद रफिक आणि काॅन्स्टेबल मोहम्मद इक्बाल, अशी तीनही जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ठार झालेला दहशतवादी पाकिस्तानचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मंगळवारपासून ही चकमक सुरू आहे. राजौरी जिल्ह्यातील नारला गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक सुरू झाली. जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी गोळीबारात लष्कराच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर