नवी दिल्ली: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीला सप्टेंबर अखेर ५४८६.५५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत अशी तुलना करता ओएनजीसीच्या नफ्यात आणि महसुलात घसरण झाली आहे. कंपनीच्या नफ्यात ३७ टक्के घसरण झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ८७३९.८३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. सप्टेंबर अखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाही निकालात ओएनजीसीच्या महसुलात १०.५ टक्क्यांनी घट झाली आहे. तो आता १.१३ लाख कोटी रुपयांहून कमी होत १.०१ लाख कोटींवर पोहोचला आहे. उत्पादनात घट झाल्याचा परिणाम कंपनीच्या महसुलावर आणि नफ्यावर झाला आहे.










































