नाशिक, ३० ऑक्टोंबर २०२०: कांद्याची साठेबाजी होऊ नये व्यापाऱ्याकडील कांदा बाजारत यावा कांद्याचा तुटवडा कमी होऊन शंभरीच्या उंबरठ्यावर गेलेले भाव कमी व्हावेत यासाठी केंद्र सरकारनं कांदा साठेबाजीवर निर्बंध लावले. यामुळं व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. सरकारनं घातलेल्या निर्बंधांनुसार घाऊक व्यापारी २५ टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांना २ टन पेक्षा जास्त कांद्याची साठवणूक करता येत नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत व्यापाऱ्यांना कांदा लिलाव सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पाठोपाठ केंद्र सरकारनं कांदा व्यापाऱ्यांना दिलासा देत कांद्याची खरेदी विक्री, प्रतवारी आणि पॅकेजिंग साठी ३ दिवसांची मुदत दिली आहे, त्यामुळं निर्बंध हटवले नसले तरी, कांदा लिलाव सुरू होण्याच्या दृष्टीनं सकारात्मक वातावरण तयार झालं आहे.
मागील आठवड्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले होते तर दुसरीकडं कांद्याचे लिलावच ठप्प झाले होते. मात्र, या दरम्यान झालेल्या या सर्व सकारात्मक गोष्टी पाहता आजपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव सुरळीत सुरू झालाय. आजपासून जिल्ह्यात कांदा लिलाव सुरू झाला असून आज जास्तीस जास्त ५,९०० तर सरासरी ४,७०० रुपये भाव निघाला.
काय म्हणाले होते शरद पवार
केंद्र सरकारच्या विरोधाभासी धोरणामुळंच कांद्याचा तिढा उद्भवल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. दरम्यान, कांदा व्यापाऱ्यांनी आता लिलाव सुरु करावेत, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं होतं कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कांद्यात नाशिकचा कांदा असतो. राजस्थान, गुजरातमध्ये कांदा लागवड होते, पण नाशिकच्या कांद्याचा दर्जा पहिला क्रमांकाचा असतो. कांद्याच्या दरात कायम चढ उतार आहेत, हा कठीण प्रश्न आहे. यावर राज्य सरकारनं नव्हे तर केंद्र सरकारनं लक्ष घालण्याची गरज आहे. राज्य सरकारकडून फारशी अपेक्षा करू नये, कारण राज्य सरकारकडे काही अधिकार नाहीत. निर्यात, आयात यात राज्य सरकारचा संबंध नाही. हे सर्व अधिकार केंद्राचेच असतात, असं पवार म्हणाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे