मंचरमध्ये कांदा उत्पादकांना अनुदान मिळालेच नाही

मंचर, पुणे १४ जुलै २०२३: सरकारच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी, १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी जाहीर केलेले प्रतिकिलो साडेतीन रुपये अनुदान हे सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनदेखील शेतकऱ्यांना अजून मिळाले नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाने कांदा अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामंध्ये कांद्याचा भांडवली खर्चही निघत नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला होता. यावर उपाय म्हणून, सरकारच्या बाजार समितीच्या आवारात विक्री केलेल्या कांद्याला प्रतिकिलो साडेतीन रुपये हा दर अनुदान तत्वावर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना अनुदानासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले होते.

गेले तीन ते साडेतीन महिने शेतकरी वर्ग या अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, कांद्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी बांधव अनुदान न मिळाल्याने हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांना लवकर द्यावे, अशी मागणी मंचर बाजार समिती उपसभापती सचिन पानसरे यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा