निर्यात बंदी नंतर देखील कांद्याच्या किंमतीत वाढ सुरूच

पुणे, २५ सप्टेंबर २०२०: कांद्याच्या किंमती वाढू नये म्हणून सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी व विरोधी पक्षांनी देखील आंदोलनं केली होती. मात्र, सरकारचा हा निर्णय फसताना दिसतोय. निर्यात बंदीनंतरही कांद्याचे दर वाढतच आहेत. निर्यातीवर बंदी आल्यापासून कांद्याचे दर २०-३० टक्क्यांनी वाढले आहेत.

कांद्याच्या किंमती डिसेंबरपर्यंत वाढत राहतील अशी अपेक्षा आहे. कारण, या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अतिवृष्टीमुळं अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामध्ये कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. अतिवृष्टीमुळं कांद्याचे पीक खराब झालंय. अतिवृष्टीमुळं खरीप पिकांची लागवड देखील उशिरा करण्यात आली. त्यामुळं प्रमुख राज्यांमध्ये खरीप पीकं देखील पुढं जाणार आहेत. अशातच १४ सप्टेंबर रोजी सरकारनं किंमती रोखण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. मात्र, याचा कोणताही फायदा झालेला दिसला नाही.

नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे मापदंड असलेल्या पिंपळगाव बाजारात कांद्याचे सरासरी घाऊक दर १४ सप्टेंबर रोजी २७ रुपये प्रति किलो वाढून २२ सप्टेंबर रोजी ३६ रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत. उत्तर भारतातील किंमती तुलनेने कमी आहेत. घाऊक किंमत १२ ते ३५ रुपये किलो आहे. किरकोळ मध्ये, चांगल्या प्रतीच्या कांद्याची किंमत ४०-६० पर्यंत पोहोचली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा