पुरंदर, दि.२१ ऑगस्ट २०२०: न्यायालयाच्या निकालानंतर आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुकत्या करण्यात आल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील काल २० ऑगस्ट रोजी कार्यकाल संपलेल्या ग्रामपंचायतींवर आज पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या सगळ्या ग्रामपंचायतींवर चारच लोक काम करणार असल्याने गावाचा विकास खुंटणार असे दिसते आहे.
पुरंदर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ २० ऑगस्ट रोजी संपल्याने या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक आज २१ ऑगस्ट सकाळपासून करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आहे. आज नियुक्ती झालेल्या पुरंदर तालुक्यातील ४ विस्तार अधिकाऱ्यांवर तब्बल २९ ग्रामपंचायतीचा मोठा गाडा हकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुरंदर पंचायत समिती मधील विस्तारधिकारी एस. के. कुंभार यांच्याकडे कोडीत (खुर्द), थापेवाडी, हिवरे, शिवरी, काळदरी, गराडे, दिवे या ग्रामपंचायतींचा कारभार सोपवण्यात आला आहे. विस्तार अधिकारी असलेले पी.एम. बगाडे यांच्याकडे पानवडी, पिसे, मांढर, केतकावळे, जवळार्जुन, धालेवाडी, नाझरे क.प, परिंचे या ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे. एन डी गायकवाड यांच्याकडे पुरंदरच्या दक्षिण भागातील लपतळवाडी, टेकवडी, नायगाव, साकुर्डे, जेऊर, निरा-शिवतक्रार या गावचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर श्रीमती पी.व्ही. जगताप यांच्याकडे कुंभारवळण, हरगुडे, वाघापूर, गु-होळी, आंबळे, खळद, भिवडी या गावचा कारभार सोपवण्यात आला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १, १९५९ च्या कलम १५१ मधील १ मध्ये खंड ( क) मध्ये असलेल्या तरतुदीनुसार प्रशासक नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकाराचा वापर करून मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी पुरंदर तालुक्यातील २० ऑगस्ट रोजी मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे.
मात्र २९ ग्रामपंचायतींवर केवळ चारच प्रशासक असल्यामुळे गावगाड्यांचा कारभार कसा चालणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विस्तार अधिकाऱ्यांना पंचायत समिती पातळीवर असलेले काम उरकत नाही. त्यावर त्यांना आता २९ गावचा गावगाडा हाकावा लागणार आहे. त्यामुळेच आता या गावातील लोकांना किरकोळ कामासाठी सुद्धा तालुका गाठावा लागणार असे दिसते. त्यातील काही विस्ताराधिकारी वैद्यकीयदृष्ट्या फिट्ट नाहीत. अनेकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांचे वयही ५४ ते ५७ च्या दरम्यान आहे. कोरोनाच्या साथी मध्ये त्यांना आपल्याच आरोग्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे खेड्यातील गावाकडचा कारभार आता सलाईनवर जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे गावच्या विकासाला मोठी खीळ बसणार असल्याचे दिसते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: