गोल पोस्ट राष्ट्रीय तब्बल ४० वर्षांत पहिल्यांदाच IGNOU च्या इतिहासात निवड झाली पहिल्या महिला कुलगुरूची!

तब्बल ४० वर्षांत पहिल्यांदाच IGNOU च्या इतिहासात निवड झाली पहिल्या महिला कुलगुरूची!

IGNOU Appoints First Woman Vice Chancellor in 40 Years
IGNOU च्या इतिहासात पहिल्या महिला कुलगुरू; प्रा. उमा कांजीलाल

IGNOU Appoints First Woman Vice Chancellor in 40 Years: “ती शैक्षणिक नेतृत्व, डिजिटल नवोन्मेष आणि संस्थात्मक ज्ञानाचा खजिना घेऊन येत आहे,” असे इग्नूने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे आणि त्यांची नियुक्ती विद्यापीठासाठी एक “ऐतिहासिक टप्पा” असल्याच ही म्हटले आहे. तर चला पाहूया कोण आहे IGNOU च्या पहिल्या महिला कुलगुरू…

जेव्हा शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) आपल्या 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला कुलगुरूपदी नियुक्त केलं, तेव्हा हा क्षण केवळ एक नियुक्ती नसून, एक क्रांती ठरला! प्रा. उमा कांजीलाल, ज्या डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या 36 वर्षांपासून आपल्या कर्तृत्वाने नवे मापदंड प्रस्थापित करत आहेत, त्यांनी 25 जुलै 2025 रोजी IGNOU च्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतली. 2024 पासून कार्यवाहक कुलगुरू म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. कांजीलाल यांच्या या नियुक्तीने शिक्षण क्षेत्रात नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे.

प्रा. कांजीलाल यांनी IGNOU मध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. मार्च 2021 ते जुलै 2024 या कालावधीत त्या प्रो-व्हाइस चान्सेलर होत्या. याशिवाय, सेंटर फॉर ऑनलाइन एज्युकेशन (2019-2021), इंटर-युनिव्हर्सिटी कन्सोर्टियम फॉर टेक्नॉलॉजी एनेबल्ड फ्लेक्सिबल एज्युकेशन (2016-2019), स्कूल ऑफ सोशल सायन्सेस (2007-2010) आणि युनिव्हर्सिटी लायब्रेरियन (2004-2006) यांसारख्या भूमिकांमधून त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. डिजिटल शिक्षण, मल्टिमीडिया कोर्सवेअर डेव्हलपमेंट आणि लायब्ररी तंत्रज्ञानातील त्यांचा गाढा अभ्यास आज त्यांना या पदापर्यंत घेवून आला आहे.

सध्या त्या शिक्षण मंत्रालयाच्या SWAYAM आणि SWAYAM PRABHA या डिजिटल शिक्षण उपक्रमांच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत. IGNOU मार्फत 268 ऑनलाइन कोर्सेस (MOOCs) आणि 43 ऑनलाइन प्रोग्राम्स ऑफर केले जातात, जे लाखो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ देतात. त्या राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया प्रकल्पाच्या मुख्य संशोधक होत्या आणि NMEICT फेज-III अंतर्गत IGNOU च्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रा. कांजीलाल यांनी आपली छाप पाडली आहे. 1999-2000 मध्ये त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय, अर्बाना-शॅम्पेन येथे फुलब्राइट फेलोशिप मिळाली. त्या कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग आणि जॉर्डनमधील UNRWA साठी सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेत मंथन अवॉर्ड फॉर ई-एज्युकेशन, ऑस्ट्रेलिया-इंडिया कौन्सिल ग्रँट आणि DANIDA फेलोशिप यांसारख्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला आहे.

40 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण, 333 शैक्षणिक कार्यक्रम, 67 प्रादेशिक केंद्रे आणि 2,257 लर्नर सपोर्ट सेंटर्स यांचा समावेश असलेल्या IGNOU च्या या विशाल यंत्रणेला प्रा. कांजीलाल यांच्या नेतृत्वाखाली नवी दिशा मिळेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि विकसित भारत@2047 च्या स्वप्नाला गती देण्यासाठी त्यांचे तंत्रज्ञान-केंद्रित दृष्टिकोन आणि समावेशक शिक्षणावरील भर महत्त्वाचा ठरेल.

प्रा. उमा कांजीलाल यांच्या नियुक्तीने शिक्षण क्षेत्रात महिलांचे नेतृत्व पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे. त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा!

न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रज्ञा शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version