पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात विरोधकांचे आंदोलन, आमदार रवींद्र धंगेकर ताब्यात

पुणे, १ ऑगस्ट २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी महाविकास आघाडीकडून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मंडई परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे भाजपने या आंदोलनास उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

विरोधकांचे आंदोलन सुरु असल्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विरोधकांनी पुण्यातील मंडई परिसरात आंदोलन सुरु केले आहे. मोदी यांनी मणिपूर हिंसाचार विषयात मौन सोडावे, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी पोहचलेले काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमच्या नेत्यांना अटक केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ईशारा महाविकास आघाडीकडून देण्यात आला आहे. पुण्यातील अंबिल ओढा चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पाच हजार पोलिस कर्मचारी तैनात केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सर्व विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेस नेत्या संगिता तिवारी यांनी म्हटले की, मणिपूर जळत असताना सत्कार आणि पुरस्कार कसले स्वीकारताय. आम्ही मोदी यांच्या या दौऱ्यास विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाकडून होणाऱ्या आंदोलनामुळे पुणे पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांना सोमवारीच नोटीसा बजावल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चांगल्या कार्यक्रमासाठी येत आहेत. परंतु त्यांना राजकीय विरोध करायचा अशी भूमिका जर घेतली तर भाजपा सुद्धा आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दिला. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. जगभरात त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यक्रमांना गालबोट लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोप भाजपाने केलेला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा