पुणे २३ जून २०२३: बिहारमध्ये पाटण्यात आज सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २३ विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला जाण्यासाठी निघताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक वक्तव्य करताना सांगितले की, देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत.
विरोधी पक्षांच्या आजच्या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थितीनुसार जागा कशा लढवायच्या? भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार कसा द्यायचा? या बाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचा, राजकीय वर्तुळातून अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अंदाज व्यक्त केला जात असतानाच शरद पवार यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर आजच्या बैठकीत काय चर्चा होणार यावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आजच्या बैठकीत देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. देशाच्या काही राज्यात, मणिपूर वगैरे आदी ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तिथेच हे प्रकार घडत आहेत. या मागे कोण आहे हे स्पष्ट होत आहे. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. यावर एकत्रित विचार करून पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे. तसेच इतर राज्यातील नेते काही मुद्दे उपस्थित करतील. पण ते आज सांगता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले. काँग्रेस नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर.