पालघर पुणे रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद

मुंबई, ३० जून २०२३: मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, मालाड आणि बोरिवली येथे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याने भरले, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि नाशिकला यलो अलर्ट जारी केला आहे . इतर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असुन पालघर, रायगड, कोकणातील काही भाग आणि पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या, इमारतींचे काही भाग कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या ३ दिवसांत झाडे पडल्याने ३ जणांचा मृत्यू झालाय. कांदिवली पूर्व येथील अशोक नगरमध्ये तेलुगू समाज सोसायटीतील बाथरूमचा स्लॅब कोसळल्याने, धुल्ला (३५) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईला लागून असलेल्या वसई, विरार आणि नालासोपारा येथे रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पहाटे कामावर निघालेले लोक रस्त्यावर पाणी साचल्याने अडकून पडले आणि कसेतरी मुंबई लोकल ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर पोहोचले. मात्र काही मुख्य रस्त्यांवर पाणीच नव्हते ही दिलासादायक बाब ठरली.

पुढील तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण विभागातील अनेक भागात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा