श्रीरामपुर, दि. १७ मे २०२०: संपूर्ण जगात आणि देशात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना अनेक दिवसापासून जिल्ह्यात लॉक डाऊन सुरू असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक जन या महामारीत मृत्युमुखी पडलेले आहेत. प्रशासनाने अशा कालावधीत हि अनेक पद्धतीने कठीण परिस्थिती हाताळून जनतेची सेवा केली आहे . दीर्घ कालावधीनंतर श्रीरामपुर नगरपालिका हद्दीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व इतर काही दुकाने काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दिवसाआड दुकाने तीन दिवसापासून सुरू झाली होती.
श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीत लॉक डाऊन सुरू झाल्यापासून व शासनाने प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोर पालन झाल्याने आजपर्यंत एकही कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच शासनाच्या सुधारित आदेशानुसार आर्थिक उलाढाली सुरू होणे आवश्यक असल्याने सोशल डिस्टसिंगचे पालन करून व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ च्या प्रभावी अंमलबजावणीचे अधीन राहून शासनाने जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु मागील तीन दिवसांपासून इतर दुकाने उघडण्यास परवानगी दिलेपासून श्रीरामपुर शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
नगरपालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष:
असे चित्र दिसत असून या काळात दुकानांसमोर ग्राहकांनी कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही व सोशल डिस्टनसिंग राखण्यात दुकानदार व पालिका प्रशासन असमर्थ ठरत आहे. याच काळात त्यांना काही मर्यादा येत आसल्याचे चित्र दिसत आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे काटेकोर पालन होत नसल्याचे सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे शहराची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास संपूर्ण शहरात कोरोना विषाणू प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही व शहराची, तसेच तालुक्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने व शहरातील /तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याला व जीविताच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देत जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त इतर सर्व चालू झालेली दुकाने बंद करण्याचे आदेश श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी प्रशांत पाटील यांनी पालिका प्रशासनाला लेखी पत्राद्वारे आज दिले आहे. यावर नगरपालिका प्रशासन ताबडतोब अंमलबजावणी करण्यास कितपत यशस्वी होते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: दताञय खेमनर