मुंबई २५ जून २०२३: कालपासून (२४,जून) मुंबईत पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे मुंबईकर पाऊस आणि रविवारच्या सुट्टीची मजा घेत आहेत. पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मरीन ड्राईव्हवर आले. दरम्यान दर रविवारी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये हॅप्पी संडेचे आयोजन केले जाते. या उपक्रमामध्ये वरळी येथील दोन युवक या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या डान्स स्टेप्स शिकवतात़.
आजही मरीन ड्राईव्ह येथे हा उपक्रम राबवण्यात आला, परंतु आज मान्सूनचा पहिला रविवार असल्याने या उपक्रमाला अजूनच रंगत चढलेली पाहायला मिळाली. यावेळी मरीन ड्राईव्ह परिसरात, मुंबई तसेच उपनगर व दूर वरून देखील मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या उपक्रमाला उपस्थित राहून भर पावसामध्ये हा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळतय.
बिपरजॉय चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा या राज्यात थैमान घातले होते. येथील समुद्रकिनाऱ्यावर समुद्राने रौद्ररूप धारण केलेले पाहायला मिळाले होते. बिपरजॉयचे संकट दूर झाल्यावर मान्सूनने महाराष्ट्रात सक्रिय हजेरी लावली. अशातच मुंबईमधील नागरिक वीकेंड चा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. परंतु हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सर्व गोष्टींचे पालन करून लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर