सांगोला, दि.१० ऑगस्ट २०२०: आयुष्यातील ७० वर्षे राजकरणात तर सलग ११ वेळा आमदार म्हणून विश्व-विक्रम व २ वेळा मंत्री झालेले सांगोला तालुक्याचे आदरणीय गणपतराव (आबासाहेब ) देशमुख यांचा आज ९३ वा वाढदिवस आहे.
आबासाहेबांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यातील मौजे. कामालापूर येथील मारुती मंदिरामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शेतकरी कामगार पक्ष, शिवशंभो प्रतिष्ठान व समस्त कामालापूर ग्रामस्थांनी मिळून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी गावातील व आजूबाजूचा गावांमधील लोकांनी ही रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले. आयोजकांकडून प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट त्यासोबत पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला.
यावेळी शिवशंभो प्रतिष्ठानच्या बाबूराव बंडगर, सतीश तंडे, रावसाहेब अनुसे, सोमनाथ अनुसे, रमेश वाघमारे, प्रा.हणमंतराव कोळवले, प्रा.बाळासाहेब कोकरे, प्रमोद ऐवळे, व्यंकटेश ऐवळे, अमित भडंगे, आनंदा ऐवळे, सुनिल तंडे, देवीदास ढोले, राहुल ऐवळे, विनायक खटके कार्यकर्त्यांनी समन्वय साधत शिबिर यशस्वी पार पाडले.
”सध्या कोरोना महामारीचे रुग्ण गावपातळीवर देखील मिळत आहेत. कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज भासू शकते त्या दृष्टीने उपाययोजना म्हणून व आबासाहेबांचा वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही आज हा उपक्रम केला आहे.” असे, शिवशंभो प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व्यकंटेश ऐवळे यांनी न्यूज अनकट प्रतिनिधीशी संवाद साधतानासांगितले.
न्यूज अनकट प्रतिनीधी: ज्ञानेश्वरी आयवळे