वाघीरे महाविद्यालयात विविध उपक्रमांचं आयोजन

पुरंदर, १ नोव्हेंबर २०२०: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयात “दक्षता जनजागृती सप्ताह” आणि “राष्ट्रीय एकता दिवस” या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. जनतेमध्ये भ्रष्टाचाराविषयी जागृती निर्माण करणं, सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शीपणा आणणं आणि उच्च नितीमुल्ये प्रस्थापित करणं या हेतूनं हा सप्ताह साजरा करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिले आहेत.

तसंच ३१ ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये भारतीय ऐक्य व सुरक्षा निर्माण करणे याकरिता हा दिवस साजरा केला जातो. तसेच हा दिवस भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. या सर्व उपक्रमांचे औचित्य साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ या विभागांच्या संयुक्त विद्यमानानौ महाविद्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन शपथ, एकता शपथ आणि ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ व ‘राष्ट्रीय एकता दिवस’ यावर आधारित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

त्यानिमित्तानं आज भ्रष्टाचार निर्मुलन शपथ व एकता शपथ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.डी.जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर लिपारे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रोहिदास ढाकणे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाव्हळ, कनिष्ट महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. काळे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात ही सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर लिपारे यांनी सर्व उपस्थितांना भ्रष्टाचार निर्मुलन शपथ व एकता शपथ दिली.

या सर्व उपक्रमांचं आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ या विभागांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर लिपारे यांनी केलं तर आभारप्रदर्शन डॉ. रोहिदास ढाकणे यांनी केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा