मुंबई, दि. ११ जून २०२० : कोरोना महाराष्ट्रात बेकाबू झाला आहे. राज्यात रुग्णांची संख्या ९५ हजारांच्या जवळपास आहे, तर जवळपास ३५०० लोक मरण पावले आहेत. गेल्या २४ तासांत ३२५४ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि १४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे वाढते संकट पाहता उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन वाढवण्याचे वक्तव्य काल केले आहे.
बुधवारी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की जर निर्बंधाचे लोकांनी पालन केले नाही तर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केले जाऊ शकते. दळणवळण व वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे लोकांना आपल्या कामापर्यन्त ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे. पण अशा अवस्थेत राज्यामध्ये कोरोना व्हायरसचे संकट झपाट्याने वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्राचा आकडा ९५,००० वर
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढून ९४,०४१ झाली आहे. तर ३,४३८ लोक मरण पावले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची ४६,०७४ सक्रिय प्रकरणे आहेत. त्याचबरोबर, उपचारानंतर ४४,५१७ लोक बरे झाले आहेत.
मुंबईबद्दल बोलायचे झाले तर येथे ५२,६६७ प्रकरणे आहेत आणि १८५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत येथे १५६७ नवीन प्रकरणे समोर आली असून ९७ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १८७९ रूग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे
उद्धव ठाकरेंनी आणखी काय सांगितले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मिशन स्टार्ट अगेन’ साठी सरकार सावध पावले उचलत आहे. आम्ही लॉकडाउन टप्प्याटप्प्याने लागू केले आणि ते तसेच काढू इच्छितो. धोका अद्याप टळलेला नाही.
ते म्हणाले की लॉकडाऊन मध्ये देण्यात आलेल्या सवलतींमुळे जर संक्रमणाचा धोका आणखीन वाढणार असेल तर लॉकडाऊन पुन्हा वाढवले जाईल. महाराष्ट्रातील जनता सरकारला सहकार्य करीत असून या सूचनांचे पालन करीत आहेत. सरकार त्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा त्यांना विश्वास आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी