गोल पोस्ट महाराष्ट्र गडचिरोलीत मुसळधार पाऊस, पुरामुळे १५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोलीत मुसळधार पाऊस, पुरामुळे १५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली, १८ जुलै २०२३ : काल मध्यरात्रीपासून जिल्ह्यांच्या सर्व भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. दुपारपर्यंत १६ प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद असल्याने जवळपास दीडशेहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी तीन ते चार फूट पाणी वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद आहे.

गोमणी नजीकच्या दिना नदीच्या पुलावरून आणि कोपर अली येथील नालाच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-मुलचेरा-आष्टी मार्ग खंडित झाला आहे. शिवाय चितगाव-कारवाफा-पोटेगाव-राजोली-आमगाव इत्यादी मार्ग बंद झाले आहेत. एकूणच पावसामुळे जवळपास दीडशेहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुडला आहे.

मागील चोवीस तासांत मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक ११७.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल एटापल्ली तालुक्यात ९५.१ मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे कुठेही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून २ हजार ४२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version