पुणे २७ फेब्रुवारी २०२५ : शहरातील ओव्हरहेड केबल्स हटवून टाकण्याचा निर्णय घेतलेल्या महापालिकेने आता एका खासगी कंपनीला तब्बल ५०० किलोमीटर अरमड फायबर ऑप्टिकल केबल उभारण्यास परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, ही केबल पथदिव्यांच्या खांबांवरून ओव्हरहेड पद्धतीने टाकली जाणार आहे. या निर्णयामुळे शहरात नव्याने केबल्सचे जाळे निर्माण होणार असून, नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महापालिकेच्या विद्युत विभागाने अलीकडेच रस्त्यावर लटकणाऱ्या धोकादायक केबल्स तोडून टाकण्याचे अभियान हाती घेतले होते. या मोहिमेमुळे अनेक भागातील जुने केबल नेटवर्क हटवले गेले. परंतु महाप्रीत या सरकारी संस्थेला मात्र खास परवानगी देत ५०० किलोमीटर ऑप्टिकल फायबर टाकण्यास मोकळीक देण्यात आली आहे. या विरोधाभासामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक तज्ज्ञांकडून सवाल उपस्थित होत आहेत.
महत्त्वाकांक्षी कमांड सेंटरसाठी मोठी तयारी
केंद्र सरकारच्या अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट योजनेअंतर्गत पुणे शहराला २५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याच अंतर्गत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे. हे सेंटर शहरातील महत्त्वाच्या कार्यालये, शाळा आणि रुग्णालयांना इंटरनेटद्वारे जोडणार आहे. या प्रकल्पासाठी महाप्रीत कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली असून, रस्ते खोदाईची अधिकृत परवानगी देखील मिळाली आहे.
ओव्हरहेड केबल्सचा मुद्दा ऐरणीवर
महाप्रीतच्या कामाला खराडी, हडपसर, विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुंढवा या भागांत वेग मिळाला आहे. पिवळ्या रंगाची ओएफसी केबल खांबांवरून टाकली जात आहे. मात्र, पालिकेनेच काही दिवसांपूर्वी ओव्हरहेड केबल्स हटवण्याचा निर्णय घेतला होता. आता नव्याने ओव्हरहेड केबल्स टाकण्याची परवानगी दिल्याने महापालिकेच्या भूमिकेतील विसंगती उघड झाली आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या तुटलेल्या केबल्समुळे पुणेकर त्रस्त होते. त्यामुळे ओव्हरहेड केबल्स हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह होता. मात्र, नव्याने ५०० किलोमीटर ओव्हरहेड केबल्स टाकण्यास दिलेली परवानगी नवीन अडचणी निर्माण करू शकते.
महापालिकेच्या या दुटप्पी धोरणावर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, महापालिकेने शहराच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे. आता या प्रकल्पामुळे पुण्याचा डिजिटल पायाभूत विकास वेग घेतो की नागरिकांच्या समस्येत भर पडते, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे










































