तवांग संघर्षावर ओवेसींचा केंद्र सरकारला सवाल, ‘देशाला दोन दिवस अंधारात का ठेवलं’

नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२२: ९ डिसेंबरच्या रात्री अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झालेत. तवांग जिल्ह्यातील यंगस्टे येथे ही घटना घडलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन चकमकीत जखमी झालेल्या ६ जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आलंय. या घटनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांना तवांग भागातील भारतीय चौकी उडवायची होती, ही योजना भारतीय जवानांनी यशस्वीपणे उधळून लावली.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर केले उपस्थित प्रश्न

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करून माहिती दिली की, अरुणाचल प्रदेशातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली असून सरकारने अनेक दिवसांपासून देशाला अंधारात ठेवलंय. संसदेचं अधिवेशन सुरू असताना याबाबत माहिती का देण्यात आली नाही?

आणखी प्रश्न उपस्थित करत ओवेसींनी लिहिलं की, घटनेचा तपशील अद्याप अपूर्ण आहे. भांडणाचं कारण काय होतं? गोळ्या झाडल्या होत्या की गलवान सारखी झडप झाली होती? किती सैनिक जखमी झाले? त्यांची अवस्था काय आहे? चीनला कडक संदेश देण्यासाठी संसद सैनिकांना जाहीर पाठिंबा का देऊ शकत नाही? यासोबतच ओवेसींनी पुढं लिहिलं की, लष्कर चीनला कधीही चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. पंतप्रधान मोदींचं कमकुवत राजकीय नेतृत्व चीनकडून या अपमानाचं कारण बनलंय. संसदेत यावर तातडीनं चर्चा होण्याची गरज आहे. मी उद्या या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडणार आहे.

या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी लिहिलं की, आमचे सैनिक देशाची शान आहेत. मी त्यांच्या शौर्याला सलाम करतो आणि ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडं प्रार्थना करतो.

प्रियांका चतुर्वेदींनी सरकारला लगावला टोला

शिवसेना (UBT) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी लिहिलं की, ‘चीननं भारताची जमीन बळकावण्याचा आणखीन एक दिवस, मात्र भारत सरकार आपल्या निवडणूक अजेंड्यात व्यस्त आहे.’ A- लाल डोळा. B- ही चिंता व्यक्त करणाऱ्या सर्वांना राष्ट्रीय विरोधी टॅग. C- योग्य उत्तर मिळंल.

काँग्रेसकडून टीका

त्याचवेळी काँग्रेस पक्षानं सरकारला कठोर भूमिका घेण्याचा सल्ला दिला. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त काँग्रेसने ट्विट केलंय. सरकारनं आपली दुराग्रही वृत्ती सोडून चीनचं हे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असं कठोर शब्दात स्पष्ट करण्याची वेळ आलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा