इंदापूर, दि. १५ ऑगस्ट २०२०: इंदापूर नगरपरिषदेने सामाजिक स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक यांच्या सहकार्याने १५ ऑगस्ट २०१९ रोजी भार्गव तलावाच्या शेजारील टाऊन हॉलच्या पाठीमागे वीस गुंठे क्षेत्रामध्ये २२०० वृक्ष लागवड करून आनंद अटल घन विकसित केले होते. यातून शहराचा ऑक्सीजन पार्क तयार झालेला होता. या ऑक्सीजन पार्कचा आज नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षसंवर्धन जोपासण्याची शपथ घेऊन, झाडांचे पूजन करून, केक कापून पहिला वाढदिवस साजरा केला.
इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, नगराध्यक्षा अंकिता शहा आणि नगरसेवक, नगरपरिषदेचे कर्मचारी यांच्या संकल्पनेतून हे ऑक्सिजन पार्क तयार झाले. या ऑक्सिजन पार्कमध्ये आंबा, चिंच, वड, काटेसावर, बेहडा,अर्जुन सादडा, अंजीर, कांचन, उंबर, पेरू,सीताफळ, शेवगा, पपई ,गोळ भेंडी, जांभुळ, इलायची चिंच, यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, विलास चव्हाण, रमेश शिंदे, अरूण शिंदे, अशोक चिंचकर, चंद्रकांत शिंदे, लिलाचंद पोळ उपस्थित होते.
इंदापूर शहरवासीयांना आपण लावलेले एक छोटे रोप आज एका वर्षानंतर त्याचे रूपांतर वटवृक्षामध्ये झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. या प्रकारचे ऑक्सीजन पार्क शहराच्या सर्व बाजूने व्हावेत, अशीही अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अल्ताफ पठाण यांनी केले. आभार गजानन पुंडे यांनी मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे