पी. एन. गाडगीळ ॲण्ड सन्स, चिंचवड यांच्या हस्ते ‘स्मृतीरंग ७५’च्या ‘पुष्प १५’चे उद्घाटन

चिंचवड, ६ जानेवारी २०२३ : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीच्या चित्रशिल्पहस्त कला विभागप्रमुख श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्या कल्पनेतून स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतींना आपल्या कलेद्वारे अभिवादन करण्याचे योजिले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरांतील प्रत्येक आठवड्यात ४ कला साधक असे २० आठवड्यांत एकूण ७५ कलासाधक आपली कला रसिकांसमोर प्रदर्शित करणार आहेत.

स्मृतीरंग ७५ (पुष्प १५) या पिंपरी-चिंचवड परिसरातील ४ कलाकारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (ता. चार जानेवारी २०२३) सायंकाळी सहा वाजता सौ. स्मिता मुधोळ, शाखाप्रमुख, पी. एन. गाडगीळ ॲण्ड सन्स, चिंचवड यांच्या शुभहस्ते झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चिंचवडचे दिवंगत आमदार मा. लक्ष्मण जगताप यांना उपस्थित सर्व कलासाधक व कलारसिकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सौ. स्मिता मुधोळ, सहभागी कलासाधक व संस्कार भारतीच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यानंतर संस्कार भारतीचे ध्येयगीत सादर केले. सौ. स्मिता मुधोळ यांचे स्वागत संस्कार भारती पिंपरी-चिंचवडच्या सचिव सौ. लीना आढाव व उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी केले.

सहभागी कलाकार १) सौ. अस्मिता गुरव, २) कु. आदिती फुलकर, ३) श्री. उमाकांत कुंभार, ४) श्री. संतोष देवे यांना प्रदर्शनाच्या उद्घाटक सौ. स्मिता मुधोळ यांचे हस्ते पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

समितीच्या सचिव सौ. लीना आढाव यांनी संस्कार भारतीच्या कार्याचा व दृष्यकला विभागाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. स्मिता मुधोळ यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना पी. एन. गाडगीळ ॲण्ड सन्स नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे असून, अनेक प्रदर्शनाद्वारे रसिकांना आकर्षित केले आहे, असे सांगितले. आमच्या संस्थेचे मा. श्री. अजितकाका गाडगीळ कलारसिक आणि आर्ट क्युरेटर असल्यामुळे आमच्या कर्मचारीवर्गाला कलेच्या सेवेची संधी मिळते यात आनंद आहे, असे सांगितले. संस्कार भारतीसारखी मोठी संस्था पी. एन. गाडगीळ ॲण्ड सन्ससोबत शहरातील सर्व वर्गातील कलासाधकांसाठी सांस्कृतिक उपक्रम राबवीत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याचबरोबर संस्थेच्या कुडजे येथील झपूर्झा आर्ट म्युझियमला भेट देण्यासाठी सर्व उपस्थितांना आमंत्रण दिले.

सर्वांच्या सहभागाने उद्घाटन सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमासाठी समितीचे सचिव सौ. लीना आढाव, समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, कार्यकारिणी सदस्य श्री. सतीशजी वर्तक, कलासाधक व कलारसिक उपस्थित होते. कलासाधक श्री. भाग्येश अवधानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, कार्यकारिणी सदस्य श्री. सतीशजी वर्तक यांनी आभार मानले.

स्मृतीरंग ७५ (पुष्प १५) हे प्रदर्शन सर्व कला रसिकांसाठी रविवारफर्यंत (ता. ८ जानेवारी २०२३) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी पी. एन. गाडगीळ कला दालन, चिंचवडगाव येथे विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनात कलाकारांच्या विविध माध्यमातील सुंदर कलाकृती प्रदर्शित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त रसिकांनी प्रदर्शनास भेट देऊन स्वातंत्र्याच्या स्मृतींमध्ये रंगून जावे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा