ओढे, नाले तुडुंब ; अनेक घरात शिरले पाणी, जनजीवन विस्कळीत
पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झाल्यामुळे पुणे शहर, जिल्हा आणि परिसरात पहाटे तीन वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. उपनगरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाचा जोर एवढा होता की, ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले.
त्यामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे पुणेकरांच्या ढग फुटीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
पुणे शहरात पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागातील घरामध्ये पाणी शिरले होते. कात्रज, स्वारगेट, पद्मावती, सहकारनगर, आंबील ओढा परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. हवामान विभागाने अजून दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. तसेच आंबील ओढ्याकडील राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पहाटे झालेल्या पावसामुळे सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. तसेच परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची हाताशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तोंडाशी आलेला घास जाणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यंदाच्या वर्षी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी चांगली हजेरी लावली आहे.त्यामुळे पुढील वर्षी दुष्काळ कमी होण्यास मदत होणार आहे.