पेंट, पोस्टर्स, नवीन बेड्स… पंतप्रधान मोदी मोरबी दुर्घटनाग्रस्तांना भेटण्यापूर्वी बदललं रुग्णालयाचं स्वरूप

मोरबी, २ नोव्हेंबर २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी त्यांच्या गुजरात दौऱ्यावर होते. पूल कोसळल्यामुळं अपघात झाला त्या ठिकाणी मोदी गेले. हॉस्पिटलमध्ये त्यांनी पीडितांचीही भेट घेतली. मात्र पीएम मोदींच्या या दौऱ्याच्या तयारीवर प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

यावेळी काही फोटो व्हायरल झालेत. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वीच मोरबीच्या सिव्हिल हॉस्पिटलचं रूप पालटल्याचं त्या चित्रांमध्ये दिसतंय. कारण रुग्णालयात रंगकाम केलं जात होतं आणि सर्वत्र साफसफाईचं काम सुरू होतं.

समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये नवीन बेड स्पष्टपणे दिसू शकतात. बेडवर पडलेल्या बेडशीटही बदलण्यात आल्यात. याशिवाय रुग्णालयाची फरशी उजळून निघालीय. हा सर्व प्रकार पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी घाईगडबडीत करण्यात आला.

आम आदमी पार्टीच्या वतीनं व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. त्या व्हिडिओंमध्ये काही कर्मचारी रुग्णालयाच्या भिंतीवर नवीन रंग लावत होते. ‘आप’नं ट्विट करून म्हटलं होतं की, पीएम मोदींच्या फोटोशूटदरम्यान इमारतीची दुरावस्था समोर येऊ नये, म्हणून हे पेंटिंग केलं जातंय.

पंतप्रधान मोदींच्या फोटोमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, अशी व्यवस्था केली जात असल्याचा आरोपही काँग्रेसनं केलाय. या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

मोठी गोष्ट म्हणजे पीएम मोदी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी प्रशासनाने ओरेवा कंपनीचं नाव लिहिलेला बोर्डही झाकून टाकला होता. याच कंपनीने मोरबी पुलाच्या दुरुस्तीचं काम केलं होतं.

मंगळवारी पीएम मोदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवीही उपस्थित होते. त्यांच्या वतीने अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली असून अपघातानंतर बचावकार्य करणाऱ्या लोकांकडून प्रश्नोत्तरं करण्यात आली.

पीएम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा जखमींच्या वेदना जाणून घेतल्या. त्यांनी रुग्णालयात अनेक पीडितांशी संवाद साधला, त्यांची प्रकृती जाणून घेतली. पंतप्रधान मुलांशी बोलतानाही दिसले. तेथे उभे असलेले डॉक्टरही जखमींची प्रकृती पंतप्रधानांना सांगत होते.

पीडितांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. त्या बैठकीत पंतप्रधानांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा