चित्रबलाक उर्फ पेंटेड स्टॉर्क हा पक्षी आशिया खंडातील निवासी पक्षी असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये आढळतो. सरोवर, दलदलीच्या जागा, पाणथळ प्रदेश आणि भातशेती अशा ठिकाणी या पक्ष्यांचा वावर असतो. पक्षिवर्गातील सिकोनिफॉर्मिस गणातील हा एक पक्षी. या गणात बलाक, बगळा, करकोचा, आयबिस व फ्लेमिंगो या पक्ष्यांचा समावेश होतो. बलाक करकोच्यापेक्षा उंच असतात. चित्रबलाक पक्षाला इंग्रजी भाषेत ‘पेन्टेड स्टॉर्क’ म्हणले जाते. चित्रबलाक सिकोनिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मायक्टेरिया ल्युकोसेफेला आहे.
चित्रबलाकच्या पाठीवरील पिसे पांढरी असून पंख आणि छातीवरील पिसांवर हिरवट काळ्या रंगाच्या खुणा असतात. पाठीवरच्या पिसांच्या टोकांकडील गुलाबी रंगामुळे या पक्षांना त्यांचे नाव मिळाले आहे. त्यांच्या पायांवर पिवळ्या व लाल रंगाच्या फिकट छटा असतात. चेहरा मेणासारखा पिवळया रंगाचा असून त्यावर पिसे नसतात. डोक्याचा थोडासाच भाग पिसांनी झाकलेला असून त्यांचा रंग फिकट केशरी असतो. चोच लांब व रंगाने पिवळी असून टोकाला बाक असतो. मादी नरापेक्षा किंचित लहान असते. चित्रबलाक उंच व सडपातळ असतात. त्याची उंची तीन ते सव्वा तीन फुटापर्यंत आणि वजन दोन ते साडेतीन किलोपर्यंत असते.
पाण्यातील जीवजंतू आणि मासे हे चित्रबलाकांचे प्रमुख अन्न आहे. ते बऱ्याचदा बेडूक, गोगलगाय पण खातात. नदीत किंवा जलाशयाच्या किनाऱ्याला उथळ पाण्यात ते अन्न शोधताना दिसतात. मासे पकडताना ते डोके पाण्यात बुडवून चोच अर्धवट उघडी ठेवतात, डोके हलवत राहतात आणि चोचीला लागलेले मासे झटकन पकडतात. तसेच पाण्यात चालताना ते अधूनमधून पायाने पाणी हलवून तळाशी असलेले मासे पृष्ठभागावर आले की पकडतात. निवाऱ्याच्या ठिकाणी ते तासनतास उभे राहिलेले दिसतात.
चित्रबलाकांचा विणीचा हंगाम पावसाळा संपत आला की सुरू होतो. या हंगामात त्यांच्या शरीराचे रंग अधिकच गडद व उठून दिसतात. मादीला आकर्षित करण्यासाठी नर पंख साफ करतात व विशिष्ट पद्धतीन हवेत उडत असतात. नर मादी दोघे मिळून घरटे बांधतात. शांत जागी, बहुधा झाडांच्या उंच टोकावर त्यांची घरटी असतात. मादी ३ ते ५ अंडी घालते. महिनाभरात पिले अंड्यांतून बाहेर येतात. पिलांचे संगोपन नर-मादी दोघे मिळून करतात. पिलांचा रंग पांढरा असून चोच राखाडी व चेहरा काळसर असतो. साधारणपणे तीन वर्षांनंतर पिलाचे प्रौढ चित्रबलाकात रूपांतर होते. विणीच्या हंगामात अनेक चित्रबलाक, अन्य पाणपक्ष्यांसमवेत, झाडांवर वसाहतीने राहतात.
सर्व प्रकारचे परभक्षी हे या पक्ष्याचे मुख्य शत्रू आहेत. आणि मनुष्य तर आहेच. करमणुकीसाठी या पक्षाची शिकार माणसे करतात. परिणामी चित्रबलाकांची संख्या घटली आहे. या कारणांमुळे त्यांना संरक्षण मिळण्यासाठी तसेच त्यांची संख्या टिकून राहण्यासाठी सरकारने कायद्यामार्फत त्यांना विशेष संरक्षण देण्यात आले आहे. विदर्भात स्टॉर्कला ढोक म्हणतात तर चित्रबलाकला चाम ढोक असे म्हणतात.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.