रंगावलीकार सोमनाथ भोंगळे यांनी रांगोळीतून रेखाटली आठवणीतील वारी

पुरंदर, दि. २५ जून २०२० : पुरंदर मधील सासवड येथील रांगोळी कलाकार सोमनाथ भोंगळे यांनी तज्ञवारीच्या पार्श्वभूमीवर सासवड येथे थ्रीडी रांगोळी रेखाटली आहे. भोंगळे हे गेली चार वर्षापासून सासवड येथे माऊलींचा वारी सोहळा सासवड मुक्कामी असताना वारीतील विविध क्षणांची क्षणचित्रे रांगोळीच्या माध्यमातून साकारत असतात. त्यांची रांगोळी पाहण्यासाठी अनेक वारकरी मोठी गर्दी करतात. मात्र यावर्षी वारीच नसल्याने ही रांगोळी पाहण्यासाठी वारकरी नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

सासवड येथे स्व. कमलाबाई माणिकचंद मुथा कन्या प्रशालेमध्ये येथे सालाबाद प्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या निमित्त वारीतील लहान मुलां पासून स्त्री, पुरूष, वृद्ध वारक-यांचे विविध भाव या थ्रीडी रांगोळीतून साकारण्यात आलेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 3D रांगोळी आर्टिस्ट सोमनाथ अनंतराव भोंगळे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही रांगोळी रेखाटली.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन असल्याने या वर्षी आळंदी ते पंढरपूर पायी वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे लाखो वारकरी, भक्तगण निराश झाले. या भक्तगणांच्या आठवणी जाग्या करून वारीचा आनंद त्यांना देता यावा म्हणून आॅनलाईन, व्हाटसअॅप, यु ट्यूबच्या माध्यमातून रांगोळी प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे घरबसल्या वारीचा आनंद लोकांना घेता येणार आहे.

या प्रदर्शनातील ‘हेलिकॉप्टरने माऊलींच्या पादुका घेऊन जातानाची ‘ रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली आहे. बालकलाकार अविष्कार सोमनाथ भोंगळे याची रांगोळी सुद्धा लक्ष वेधून घेते.

या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते झाले या वेळी सनदी अधिकारी राजेंद्र जगताप, प्राचार्य अरुण सुळगेकर, इस्माईल सय्यद उपस्थित होते.

या प्रदर्शनात सोमनाथ भोंगळे यांना सहकलाकार मयुर दुधाळ, अविष्कार भोंगळे,अभिषेक शिंदे, पायल गिरमे, मयुरी गिरमे, रिया भोंगळे यांनी साथ दिली. लाॅकडाऊन मुळे आॅनलाईन प्रदर्शन पाहता येईल असे सासवड नगरसेविका सौ. सीमा सोमनाथ भोंगळे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा