पाकिस्तानने नामिबियाचा 45 धावांनी पराभव करत केले उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित

नवी दिल्ली,3 नोव्हेंबर 2021: T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा जबरदस्त खेळ सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा 45 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. T20 विश्वचषकात, पाकिस्तानने सलग चार सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांची गट-2 मधील जागा प्लेऑफसाठी निश्चित झाली आहे.

नामिबियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 189 धावा केल्या होत्या, पुन्हा एकदा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने चमकदार कामगिरी केली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके ठोकत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. पाकिस्तानसमोर नामिबियाचा संघ बेदम दिसत होता.

टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा गौरवशाली प्रवास सुरुवातीपासूनच सुरू आहे. भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्ताननंतर आता नामिबियालाही पाकिस्तानने पराभूत केले आहे. पाकिस्तानने दिलेले 190 धावांचे लक्ष्य गाठण्यात नामिबिया अपयशी ठरला, 20 षटकांत त्यांना केवळ 144 धावा करता आल्या. नामिबियाकडून डेव्हिड वेसने 43 धावा केल्या.

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानचा अप्रतिम प्रवास सुरूच

बाबर आझमने नामिबियाविरुद्ध 70 धावा केल्या, एका अर्धशतकासह तो या T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाबर आझमने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 198 धावा केल्या आहेत. बाबर आझमने मंगळवारी नामिबियाविरुद्ध 70 धावा केल्या, ज्यात त्याने 7 चौकार मारले.

बाबर आझमने गेल्या चार डावांत तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने भारताविरुद्ध 68, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 9, अफगाणिस्तानविरुद्ध 51 आणि आता नामिबियाविरुद्ध 70 धावा केल्या. बाबर आझमच्या नावावर या T20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही नोंदवला गेला आहे.

बाबर आझमशिवाय मोहम्मद रिझवाननेही या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. मोहम्मद रिझवानने 50 चेंडूत 79 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 4 षटकार आणि 8 चौकारही लगावले. यासह या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून, त्याच्या पुढे फक्त जोस बटलर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा