पाकिस्तान बनला जगातील नंबर वन वनडे संघ, अफगाणिस्तानवर ३-० ने मात करून मालिका जिंकली

कोलंबो, २७ ऑगस्ट २०२३ : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने मोठा विजय नोंदवला. पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ५९ धावांनी पराभव करत अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत मालिका ३-० ने जिंकली. यासह पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाची वनडे राजवट संपुष्टात आणली आहे. आता पाकिस्तान हा जगातील नंबर वन वनडे संघ बनला आहे.

श्रीलंकेच्या आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ गड्यांच्या मोबदल्यात २६८ धावा केल्या आणि अफगाणिस्तानला विजयासाठी ५० षटकात २६९ धावांचे लक्ष्य दिले.

पाकिस्तानच्या फलंदाजीत दोन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. कर्णधार बाबर आझमने ८६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या आणि यष्टिरक्षक- फलंदाज मोहम्मद रिझवानने ७९ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली. इतर कोणत्याही फलंदाजाला ४० धावांचा वैयक्तिक आकडा गाठता आला नाही.

अफगाणिस्तान संघाने ८ चेंडू बाकी असताना ४८.४ षटकांत सर्वबाद २०९ धावा केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजीत शादाब खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. शाहीन आफ्रिदीने २, फहीम अश्रफने २, मोहम्मद नवाजने २ आणि आगा सलमानने १ बळी घेतला. मोहम्मद रिझवानला या सामन्यासाठी सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले आणि इमाम-उल-हक AFG वि PAK एकदिवसीय मालिका, २०२३ साठी मालिकावीर ठरला.

विशेष म्हणजे २२ ऑगस्ट रोजी हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात, पाकिस्तानने अफगाणिस्तानचा १४२ धावांनी पराभव केला. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी याच मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने १ गडी राखून विजय मिळवला. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ३-० असा पराभव केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा