नवी दिल्ली, 20 ऑक्टोंबर 2021: पाकिस्तान आणि भारत यांच्यात आगामी टी -20 विश्वचषकाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तानी नौदलाने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानी नौदलाने एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, भारतीय पाणबुडीने पाकिस्तानच्या समुद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्या नौदलाने भारताची पाणबुडी फक्त डिटेक्टच केली नाही तर ती शोधताना तिचा मार्ग देखील अडवला.
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने सांगितले की, पाकिस्तानी नौदलाने भारतीय नौदलाच्या पाणबुडीने पाकिस्तानी पाण्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न रोखला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतीय पाणबुडीने 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाकिस्तानी नौदलाने भारतीय पाणबुडी डिटेक्ट केली. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारतीय पाणबुडीचा शोध घेताना पाकिस्तानी नौदलाच्या लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती विमानाने मागोवा घेतल्याची ही अशा प्रकारची तिसरी घटना आहे.
डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2019 मध्येही पाकिस्तानी नौदलाला अशाच प्रकारे भारतीय पाणबुडी सापडली होती आणि त्यांना हवे असल्यास ते पाणबुडी सहज नष्ट करू शकले असते, परंतु त्यांना शांततेचा संदेश द्यायचा होता. त्यावेळी नौदलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पाणबुडीला पाकिस्तानी पाण्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानी नौदलाने आपल्या विशेष कौशल्यांचा यशस्वी वापर केला आहे.” डॉनच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी नोव्हेंबर 2016 मध्ये भारतीय पाणबुडीने घुसखोरीचा प्रयत्न केला होता, पण पाकिस्तानी नौदलाने त्यावेळी ही पाणबुडी शोधून ती पाकिस्तानी पाण्यातून काढून टाकली होती.
युनायटेड नेशन्स कनव्हेन्शन ऑफ द लॉ ऑफ द सी या कायद्यानुसार, कोणताही देश कोणत्याही देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कोणतीही गस्त पूर्व माहितीशिवाय करू शकत नाही. विशेष आर्थिक क्षेत्रात, किनारपट्टीच्या देशांना सर्व नैसर्गिक संसाधनांचा शोध, शोषण, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याचा सार्वभौम अधिकार प्राप्त होतो. या प्रकरणी भारतीय नौदलाकडून कोणतेही अधिकृत विधान नाही. मात्र, भारतीय सूत्रांनी पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे